झेलमचे युद्ध ! (BC 326)


झेलमचे युद्ध  !
Battle of Hydaspes River !



प्रास्ताविक:

मी जेव्हा"भारतीयांचे अपमानास्पद पराभव" ही लेखमालिका लिहायला घेतली तेव्हा अनेकांनी विचारणा केली की भारतीय सेनानींच्या अनेक विजयगाथा इतिहासात घडलेल्या असताना नेमका पराभवांचा इतिहास जगापुढे मांडून मला काय साध्य करायचेय? अशी नकारात्मक विचारसरणीच उन्नतीस बाधक ठरते वगैरे. विजयापेक्षा पराजय अधिक शिकवून जातात असे मी मानतो आणि हेच माझे या प्रश्नास उत्तर असेल. असो.
मागील भागात आपण मराठे आणि इंग्रज यांच्यातील खडकीच्या लढाईची माहिती आपण घेतली. पण आज आपल्याला जवळपास २३२६ वर्षे मागे झेलम नदीच्या तीरी जायचे आहे.
आपण आज पाहणार आहोत अलेक्झांडर उर्फ सिकंदर ( यापुढील लेखात याचा उल्लेख बहुतांश वेळा "अलक्षेन्द्र" असा असेल) आणि पौरस यांच्यातील इ. स. पूर्व ३२६ सालच्या जून मध्ये झालेल्या भीषण रणसंग्रामाकडे.
जसे पानिपतचे तिसरे युद्ध समजायचं तर अहमदिया करार समाजाला पाहिजे तसचं मुळात ग्रीस मधील म्यासेडोनीया चा अलक्षेन्द्र आणि भारतातील पौरस यांच्या त भांडणे होऊन युद्ध होण्याचे कारणच काय हे प्रथम समजून घेतले पाहिजे.
त्यासाठी थोडे आपण म्यासेडोनीया (ग्रीस) च्या इतिहासाकडे पाहू.
ग्रीस, ग्रीक साम्राज्य आणि त्यांची लष्करी परंपरा:
म्यासेडोनीया हा सध्याचा ग्रीस देशाच्या उत्तरेस आहे. त्यास सामान्यतः नॉर्थ म्यासेडोनीया म्हणून संबोधले जाते. आपण या लेखात ज्या कालावधीतील ग्रीस बाबत बोलतोय जो ग्रीस आणि आजचा एकसंध ग्रीस हे फार वेगळे आहेत. तत्कालीन ग्रीस म्हणजे वेगवेगळ्या राज्यात विभागलेल्या प्रदेशांचा समूह होता. या राज्यांना कालपरत्वे प्रतिष्ठा आणि महत्व मिळत गेले आणि कालपरत्वे ते लुप्तही होत गेले. या राज्यांत एकराष्ट्रीयत्वाची भावना वगैरे अशी काही नव्हती. संकटाच्या वेळी ते तात्पुरते एकत्र येत आणि संकट निवारल्यावर ते पुन्हा जुने वैर काढून एकमेकांशी भांडत. त्यावेळी पर्शियाचे साम्राज्य बलाढ्य होते. भूप्रदेशाच्या वादातून अनेक पर्शियन हल्ले ग्रीस वर झाले. बहुतेक वेळा ग्रीसलाच मार खावा लागे. मॅरेथॉन च्या लढाईने हे चित्र पालटले.पुढे इ. स. पूर्व ४८० मध्ये सलामीन्सच्या नाविक लढाईत पर्शियन नौदलाचा पराभव झाला आणि पर्शियाचा सम्राट Xerxes ने आपले ग्रीस वरील आक्रमण आटोपते घेतले. यापुढे जसजसे पर्शियन साम्राज्य कमकुवत होत गेले तसतशी ग्रीसची शक्ती वाढत गेली. पर्शियाकडून झालेल्या पूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्याची ग्रीसची तुष्णा एका पिढी कडून पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून मिळत गेली आणि ती वाढतच गेली. हीच परंपरा पुढे अलक्षेन्द्रला मिळाली असणार. अलक्षेन्द्र चे वडील राजे फिलिप्स हे एक निष्णात योद्धे होते. संपूर्ण ग्रीस मधील राज्ये एकत्र करून पर्शिया चे साम्राज्य उध्वस्त करून बलाढ्य ग्रीक साम्राज्य स्थापन करायचे स्वप्न त्यांनी पहिले. त्यांच्या काळात ग्रीक सेनेत त्यांनी आमूलाग्र बदल केले. मुळात ग्रीक लष्करास चांगली परंपरा होती. प्रत्येक पिढीगणिक त्यांनी आपले युद्ध तंत्र विकसित करत नेले होते. त्यात त्यांना धातू शास्त्राची ओळख आणि भौगोलिक परिस्थितीची साथ होती. Iphikrates या सेनानीनी ग्रीक शस्त्रास्त्रांमध्ये क्रांती केली. त्याआधीचे ग्रीक पायदळ सैनिक अत्यंत जड चिलखत वापरत आणि त्यांच्या कडे ६ फुटी लांब भाले असत. जाड चिलखताने त्यांचे शत्रूच्या वारांपासून संरक्षण होई पण त्यांच्या चपलतेवर खूप परिणाम होई. Iphikrates ने मग या ग्रीक पायदळ सैनिकांकडे हलके चिलखत दिले. ६ फुटी लांब भाल्यांची जागा ९ फुटी भाल्यांनी, ३० इंच लांब पात्याच्या तलवारीने घेतली. यामुळे जरी चिलखत कमकुवत झाले असले तरी पायदळ सैनिकांची मारक क्षमता वाढली. शिवाय त्यांना डोंगरी भागात सोयीचे पडतील असे पायताण दिले. फिलिप्स च्या काळात वेढ्यात वापरले जाणारे कॅटापुल्ट, टॉवर वगैरे साधने वापरण्यात सेनेला तयार केले गेले. आखूड भाले आणि धनुष्य बाण यांनी सिद्ध असलेले हलके पायदळ उभारण्यात आले.
दुर्दैवाने आपले स्वप्न पूर्ण होण्या आधीच फिलिप्सचा खून झाला. २० वर्षीय तरुण आणि तडफदार अलक्षेन्द्रने ही संधी साधून त्वरित राज्य कारभार हातात घेतला. थिसली घेऊन त्याने थिसलिची उत्तम घोडदळ सेना हस्तगत केली. नंतर युद्ध न करताच त्याने अथेन्स घेतले. स्वतःची सर्व संपत्ती विकून तो मोहिमेस सज्ज झाला.
जेव्हा तो मोहिमेस निघाला तेव्हा त्याच्या कडे ३०००० पायदळ आणि ५००० निष्णात घोडदळ होते. पायदळाचा मुख्य कणा होत्या त्या म्हणजे त्याच्या phalanx तुकड्या. या phalanx मधील सैनिकांकडे १५ फूट लांब भाले असत आणि ते घुढघ्यापर्यंत चिलखत घालत. अशा १५०० सैनिकांची एक phalanx तुकडी, अशा ६ तुकड्या(एकूण ९०००) त्याचा पायदळात होत्या.
त्याच्या पायदळात दुसरी तुकडी होती ती म्हणजे Hypaspits. या तुकडीतील सैनिक आखूड भाले बाळगत, पण त्यांच्या कडे लांब पात्याचा तलवारी असत. ते वस्तुमानाने हलके चिलखत वापरात. त्यामुळे तेphalanx मधील सैनिकांपेक्षा अधिक चपळ असत. हे Hypaspits सैनिक प्रत्येकी १००० च्या तीन तुकड्यात विभागलेले असत(एकूण ३०००).
तिसरे पायदळ प्रकारचे सैन्य असे ते म्हणजे hoplites. या hoplites तुकडीतील सैनिक चिलखत घालत, ढाल ,तलवार आणि javelin बाळगत. javelin म्हणजे एक प्रकारचा भालाच. पण तो हलका असे आणि हातातून फेकता येत असे. hoplites ची संख्या १२००० असे.
बाकी भाडोत्री (mercenaries) म्हणता येतील असे ६००० सैनिक असत आणि ते धनुष्य बाण आणि javelin बाळगत.
आता घोडदळ. घोडदळाचा मुख्य भाग राजाचे अंगरक्षक (king’s guard) असत. त्यांना companions म्हणत आणि त्यांची संख्या २००० होती. शिवाय वर उल्लेखित थिसलीचे २००० उत्तम प्रतीचे घोडदळ होते. आणि बाकी १००० Thrace आणि Balkans मधून भरती केलेले घोडदळ असे.
या व्यतिरिक्त डायडेस च्या नेतृत्वाखाली अभियंत्यांचे एक पथक त्याच्या सेने सोबत असे. या पथकावर वेढ्यात वापरल्या जाणाऱ्या कॅटापुल्ट, टॉवर, पूल बांधणे वगैरे अभियांत्रिकी कामांची जबाबदारी असे. या शिवाय शास्त्रज्ञ, वैद्य, ज्योतिषी, हवामान तज्ज्ञ, संगीती या सर्वांचा भरणा त्याच्या सैन्यात असे. तो त्याच्या मोहिमेचे नियमित टिपण ठेवत असे.
या सर्व प्रचंड तयारीनिशी इ. स. पूर्व ३३६ मध्ये अलक्षेन्द्र म्यासेडोनीया मधून मोहिमे साठी निघाला. या मोहिमांमध्ये त्याने प्रथम मिस्र (इजिप्त), आणि नंतर पर्शियन साम्राज्याशी अनेक लढाया केल्या. प्रथम त्याने मिस्र जिंकले. नंतर इसस (November 5, 333 BC) आणि मग ग्वागेमेला (October 1, 331 BC) येथे त्याने पर्शियन सेनेस पूर्णतः नेस्तनाबूत केले. या दोन्ही लढयात पर्शियन नेतृत्व खुद्द सम्राट दरायस करत होता. आणि लढाई आपल्या विरोधात जातेय बघून तो रण सोडून पळून गेला. ग्वागेमेला येथे तर तो अलक्षेन्द्राच्या हातात पडता पडता वाचला. पर्शियन साम्राज्य जिंकल्यावर खरे तर त्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले होते. १० वर्षे सतत लढून, घरापासून दूर राहून कदाचित त्याचे सैन्यही आता कंटाळले असावे. पण अलक्षेन्द्रास अजून पूर्वेकडील प्रदेश खुणावू लागला. त्याने अजून पूर्वेकडे आपला मोर्चा वळवला. वाटेत त्याचा काही स्थानिक टोळ्यांशी संघर्ष झाला. आपल्याला त्यात फार खोलात जायची गरज नाही. पण Scythian नावाच्या एका टोळीने त्याला चांगलेच सतावले. आपल्या धनुर्धारी घोडदलाच्या मदतीने Scythian टोळीने "मारा आणि पळून जा" अशी युद्धनीती वापरून ग्रीक सैन्यास जेरीस आणले. पुढे अलक्षेन्द्र ने या टोळीचा पराभव केला आणि एखाद्या निष्णात जन्मजात धुरंदर सेनापतीच्या गुणांना जागून मग त्यांचे धनुर्धारी घोडदळ आपल्या सैन्यात सामावून घेतले हे इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता तो तक्षशिला या भारताच्या सरहद्दीच्या राज्यापाशी येऊन ठेपला.
ग्रीक साम्राज्य त्याच्या उत्कर्षाच्या चरमबिंदूवर होते, अलक्षेन्द्राच्या गरुडरूपी नजरेतून आता ते भारतीय उपखंडाकडे अधाशी पणे बघत होते !

===============================================================

भारत - सांस्कृतिक आणि लष्करी परंपरा:

सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून ज्याची दंतख्याती आहे त्या भारताची अवस्था देखील ग्रीस पेक्षा काही वेगळी नव्हती. तसे पाहता भारताला .. पूर्व ४००० पासूनची परंपरा आहे असे मानतात. मिस्र च्या पूर्वीपासून नसली तर किमान त्याच्या इतकीच जुनी संस्कृती भारतात होती. पण एक राष्ट्र म्हणून भारत कधीही उभा राहिलेला दिसत नाही. अगदी रामायण, महाभारताचा कालखंड पहिला तरी भारत अनेक राज्यात विभागलेलाच दिसून येतो. या राज्यांमध्ये सुद्धा भांडणे तंटे असणारच. मग सीमा आणि राज्य विस्तारासाठी अश्वमेध यज्ञ करून दुसरया राज्याच्या राजास आव्हान देऊन त्याचा पराभव करून त्यास मांडलिक करून घेणे आणि त्याचे राज्य आपल्या राज्यास जोडणे हे प्रकार भारताच्या इतिहासात सर्रास पाहायला मिळतील. लंका जिंकल्यावर रामाने, भारतीय युद्धानंतर युधिष्ठीराने किंवा अगदी अलीकडे सातवाहन राज्यांनी अश्वमेध करून राज्यविस्तार केलेला आढळतो. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळीही भारत असाच विभागलेला होता. जनपथ. महाजनपथ, गणराज्य अशा प्रकारच्या राज्यात त्याची विभागणी होती. सर्वात पश्चिमेकडे होते तक्षशिला. तक्षशिला ही जनपथ होते की महा जनपथ याची माहिती मला मिळाली नाही. सिंधू आणि झेलम या नदीच्या मधील प्रदेश तक्षशिला म्हणवला जात असे. आंभी हा राजा तेथे राज्य करत असे. त्याचा अलीकडे भारताच्या बाजूला होते राजा पौरसाचे राज्य. मला नक्की सांगता येत नाही पण बहुदा हे साकला जनपथ असावे. खात्री लायक माहिती नसल्याने आपण पौरसाच्या सैन्याचा उल्लेख यापुढे लेखनाच्या ओघात येइल तसा "भारतीय सैन्य" किंवा "पौरसाचे सैन्य" असाच करणार आहोत.

पौरसाची विशेष माहिती मिळत नाही. त्याचे राज्य झेलम आणि चिनाब नद्यांच्या परिसरात पसरले होते. त्याच्या शेजारील अभिसार या राज्याच्या मदतीने त्याला त्याचे राज्य पूर्वेकडे रावी नदीच्या पलीकडे आणि पश्चिमेस झेलम नदीच्या पलीकडे विस्तारायचे होते. याच मुळे या आंभी आणि पौरसाचे हाडवैर होते. या आधीच्या काही लढयात बलाढ्य पौरसाने आंभीवर वर्चस्व राखले होते. त्यामुळे आंभी हा पौरसाचा वचपा काढण्यासाठी संधी शोधतच होता. ही संधी त्याला अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या निमित्ताने दिसली. या गोष्टीचा अभ्यास करताना "भारतावर पश्चिमेकडून होणारे आक्रमण थांबवण्याचे प्रथम कर्तव्य तक्षशिलेचे होते" अशी एक भावना असते. पण मुळात तत्कालीन भारत हे राष्ट्र नसल्याने अशी अपेक्षा करणे कितपत व्यवहार्य आहे हे वाचकांनीच ठरवावे. त्यामुळे पौरसविरुद्ध अलक्षेन्द्र ची मदत करून आंभीने राष्ट्र द्रोह केलाय असे मानण्याचे किंवा अलक्षेन्द्र विरुद्ध लढून पौरसाने राष्ट्र कार्य केल्याचे मानण्याचे मला तरी काही कारण दिसत नाही. बलाढ्य अलक्षेन्द्रशी लढा देण्यापेक्षा त्याचा वापर पौरसविरुद्ध करण्याचे आंभीने ठरवले. त्याने अलक्षेन्द्रचे मांडलिकत्व पत्करून त्याला भेटी पाठवल्या. आणि पौरसविरुद्ध त्याचाशी युती केली. शिवाय पौरसाच्या विरोधात लढण्यासाठी आपले ५००० सैन्यही त्याने अलक्षेन्द्र यास दिले. आंभी बरोबरच आजूबाजूच्या काही छोट्या छोट्या राजांनीही अलक्षेन्द्राचे मांडलिकत्व पत्करले. खुद्द पौरसाचे काही जवळचे नातेवाईक एक मुलगा अलक्षेन्द्र यास जाऊन मिळाला असावा.

तक्षशिला एकदमच स्वस्तात ताब्यात आल्यावर अलक्षेन्द्र ने पौरसाकडेही दूत पाठवला आणि त्याला शरण येऊन मांडलिकत्व आणि मांडलिकत्वाच्या रूपात लपेटलेली तथाकथित मैत्रीचे निमंत्रण दिले. पौरस तक्षशीलेचे अनुकरण करेल अशी अलक्षेन्द्राची अपेक्षा फोल ठरली. पौरसाने त्याला निरोप पाठवला की तो अलक्षेन्द्राचे सीमेवर सशस्त्र सेनेनीशी स्वागत करेल. युद्ध अटळ आहे म्हटल्यावर दोन्ही बाजूनी युद्धाची तयारी सुरु झाली.

===============================================================

पौरसाची सैन्य शक्ती:-

भारताला जशी खूप मोठी सांस्कृतिक परंपरा आहे तशीच लष्करी परंपरा पण आहे. पुराणातील देव दानव संघर्षापासून अगदी महाभारतापर्यंत झालेल्या अनेक युद्धात नानाविध शस्त्रांचे उल्लेख येतात. यात ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, पर्जन्यास्त्र अशी अनेक नावे घेता येतील. ब्रह्मास्त्राचे ही अनेक प्रकार असावेत. ही अस्त्रे (जर खरंच अस्तित्वात असली तर 🤔🤔🤔) फार थोड्याना माहित असत. शिष्याची योग्यता पाहूनच मग गुरु ती त्यांना शिकवत. ही अस्त्रे कोणावर वापरावी याचेही संकेत होते. धनुष्य बाण, त्रिशूल, गदा, तलवार, ढाल, कमल, शंख, चक्र अशा अनेकविध शस्त्रानी भारतीय पुराणे नटलेली आहेत. लढाईत वापरल्या जाणाऱ्या व्यूहांचीं (strategic formations) यादीही खूप मोठी आहे. मला महाभारतातील किमान १७ प्रकारचे व्यूह सापडले. त्याची यादी इथे द्यायचे काही प्रयोजन नाही. पण हे सर्व व्यूह, अस्त्रे हे जर खरंच अस्तित्वात असतील तर भारतीय युद्ध शास्त्र खूप प्रगत होते असेच मानावे लागेल. पण भारतात दस्तऐवजीकरण पद्धती नसल्याने ही सर्व शस्त्रे, शास्त्रे (जर अस्तित्वात होती असे मानले तर) कालौघात नामशेष झाली असावीत एवढेच आपण आज म्हणू शकतो.

महाभारत कालीन युद्धात सेना चार प्रकारात विभागलेली असे.

१. पायदळ

२. अश्वदल

३. रथ दल

४. गजदल.

या सेनेस चतुरंग सेना असे संबोधत असत. आश्चर्यकारकरित्या यात उंटदल आणि नाविक दल कसे नाही हे समजत नाही. पौरसाचे सैन्य ही याच चार दलांनी बनलेले होते. अलक्षेन्द्र विरुद्ध त्याच्याकडे जी सेना होती त्याचे अचूक आकडे मिळत नाहीत. पण जी माहिती मिळते ती खालील प्रमाणे.

१. पायदळ- ३००००

२. रथदल- ५००(अंदाजे)

३. घोडदळ- ५०००(अंदाजे)

४. गजदल- २००(अंदाजे)

५. धनुर्धारी सैन्य- निश्चित आकडा कळत नाही.

दोन्ही सैन्यदलांचा तुलनात्मक अभ्यास-

संख्येने जास्त असले तरी भारतीय सैन्य अनेक बाबतीत ग्रीक सैन्या पुढे कमकुवत होते.

१. पायदळ- मागे वर सांगितल्या प्रमाणे ग्रीक पायदळ चिलखताने संरक्षित होते. तर भारतीय पायदळ चिलखताच्या संरक्षणाशिवाय होते. ते javelin आणि तलवार बाळगत. ग्रीक phalanx ना शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित धारधार(drilled) हालचाली करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. भारतीय पायदळ शिस्तबद्ध नसे.

२. अश्वदल- ग्रीक अश्वदल ही उत्तम प्रतीच्या अरबी, तुर्क आणि थिसालीयन जातीच्या अश्वानी बनलेले होते. हे अश्व पौरसाकडील सर्व अश्वांच्या तुलनेत सरस होते. शिवाय पौरसाच्या अश्वदलाच्या दुप्पट संख्येत होते. ग्रीक घोडेस्वार सैनिक चिलखत घालत असत.

३. रथदल- ग्रीक सैन्याकडे रथदल नव्हते. ग्वागेमेला येथील लढाईत त्यांनी पर्शियाच्या रथदलाचा विरुद्ध वापरता येईल असे तंत्र विकसित केले होते आणि यशस्वीरीत्या वापरलेही होते.

४. गजदल- रोमनांना भीती वाटावी असे हे शस्त्र पौरसाकडे होते. ग्वागेमेला मध्ये पर्शियन गजदल होते, पण बहुदा ते वापरलेच गेले नाही. आपले अश्वदल या प्रचंड हत्तींना पाहून कच खाईल अशी भीती अलक्षेन्द्रास होती. पण यावर त्याने उपाय शोधला होता. या युद्ध हत्तींवर अंबारीत धनुर्धारी आणि भाला फेक करणारे सैनिक असत.

५. धनुर्धारी सैन्य- भारतीय धनुर्धारी जे धनुष्य बाण वापरत ते खूप अवजड होते. भारतीयांचे धनुष्य हे पुरुषभर उंचीचे होते. वापरताना त्याची एक बाजू जमिनीत रोवून मग त्याच्यावर तिर चढवून बाण सोडावा लागत असे. भारतीयांचे बाण ३ फूट लांब असत आणि जवळपास कोणतेंही कवच भेदत असत. या उलट ग्रीक सेनेत Scythian धनुर्धारी घोडदळ होते. त्यांचे बाण जरी भारतीयांइतके घातक नसले तरी विनाचिलखत लढण्याऱ्या भारतीय सैनिकांना मारण्यासाठी पुरेसे होते. त्यांना घातकता आणि चपळता असा दुहेरी फायदा होता.

वरील विवेचनावरून तथाकथित थोर सांस्कृतिक आणि विज्ञान परंपरा लाभलेल्या भारताचे सैन्य ग्रीक सैन्यापुढे शस्त्रास्त्रे, शिस्त या बाबत किती मागास होते हे लक्षात येईल.

===============================================================


लढाईपूर्वीच्या हालचाली :


पौरसाने मांडलिकत्व झिडकारून लावल्यावर अलक्षेन्द्राने त्याच्या राज्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. त्या साठी त्याला झेलम नदी ओलांडावी लागणार होती. त्याआधी त्याने तक्षशिला ही आपले मुख्य केंद्र बनवले. तेथे त्याने जखमी सैनिकांवर उपचार केले आणि त्यांना युद्धास सिद्ध केले. तयारीबाबत पूर्ण समाधानी झाल्यावरच त्याने झेलम नदीच्या दिशेने कूच केले. तिकडे पौरसानेही आपले सैन्य झेलम नदीच्या पूर्व किनाऱ्यावर बचावात्मक पवित्र्यात तयार ठेवले. झेलम ओलांडण्यासाठी अलक्षेन्द्रास होड्यांचा पूल बांधावा लागणार होता. पूर्वी सिंधू ओलांडण्यासाठी त्याच्या अभियंता तुकडीने सिंधुनदीवर होड्यांचा पूल बांधला होताच. त्याच होड्या काढून त्याने कोईनॉस या आपल्या अधिकाऱ्याकडून झेलम नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर आणून ठेवल्या. पुढे ज्या घाईत ग्रीक सेनेने झेलम पार केली त्यावरून या बोटी वापरल्या असतील की नाही याबाबत शंका येते. अलक्षेन्द्र आणि पौरस दोघंही नदीच्या विरुद्ध बाजूच्या किनाऱ्यावर एकमेकांसमोर तळ ठोकून बसले. पौरसाने आपल्या तळाच्या उत्तर आणि दक्षिण बाजूच्या किनाऱ्यावर ठराविक अंतरावर चौक्या उभारल्या. माझ्या अंदाजाने कमीत कमी १० मैल अंतरापर्यंत दोन्ही बाजूस या चौक्या असाव्यात. ग्रीक सैन्याने कोठेही नदी पार करायचा प्रयत्न केला तरी त्याची खबर पौरसास आता मिळाली असती. आणि मग नदी पार करणाऱ्या ग्रीक सेनेवर आपले सैन्य घालून त्यांना परास्त करणे त्याला सहज शक्य होते. अलक्षेन्द्रास यावर काही उपाय शोधणे आवश्यक होते. त्याने प्रथम त्याच्या गोटात चार पाच महिने पुरेल इतकी अन्न धान्याची बेगमी करण्यास सुरुवात केली. आणि ही बातमी पौरसास समजेल अशी व्यवस्था केली. आपली काही मोठी घोडदळ पथके मधूनच तो झेलम नदीच्या उत्तर किंवा दक्षिण किनाऱ्यावर पाठवी. यातून तो असे भासवी की ही पथके मूळ गोटापासून दूरवर कोठेतरी नदी पार करणार आहेत. पौरसाच्या सैन्याच्या तुकड्या ही विरुद्ध किनाऱ्यावरून ग्रीक तुकड्याचा पाठपुरावा करत नदीच्या पूर्व किनाऱ्यावरून फिरत. बरंच अंतर गेल्यावर ग्रीक तुकड्या परत मूळ गोटाकडे परतत असत. अलक्षेन्द्राने भारतीय सैन्यास असे अनेक दिवस झुलवले. पौरसाचे सैन्य या सगळ्याला इतके वैतागले की पुढे पुढे त्यांनी पलीकडील किनाऱ्यावर मागे पुढे करणाऱ्या ग्रीक सैन्याचा पाठपुरावा करणेही सोडून दिले होते. ही गोष्ट इ. स. पूर्व ३२६ मधील मे महिन्यातील मधील असावी. लवकरच मान्सून येणार होता. आता मान्सून परतल्याशिवाय काही अलक्षेन्द्र नदी पार करत नाही अशी पौरसाची खात्री पटत चालली होती. भारतीय सैन्य आता थोडे गाफील राहू लागले होते.

मधील काळात अलक्षेन्द्राने नदी पार करण्यासाठी सोयीची जागा पाहून ठेवली होती. त्याच्या मुख्य तळापासून उत्तरेकडे १७ मैलांवर झेलम एक वळण घेत होती. त्या वळणाच्या थोडेच अलीकडे एक नैसर्गिक बेट नदीस विभागात होते. ते बेट झाडे झुडुपे यांनी भरलेले होते. ग्रीक सैन्य नदीच्या पार न्यायला ही उत्तम जागा होती. पौरस आणि त्याचे सैन्य गाफील झाल्याची खात्री पटताच त्याने नदी पार करून पौरसाविरुद्ध आक्रमण करण्यासाठी एक रात्र ठरवली.

अलक्षेन्द्राने आपल्या सेनेचे तीन भाग केले.

१. Krateros च्या नेतृत्वाखाली एक भाग जो पौरसाच्या मुख्य तळाच्या समोर अलक्षेन्द्राच्या मुख्य तळावर राहणार होता. या सेनाविभागाची खालील मुख्य उद्दिष्टे होती.

(अ) पौरसाच्या सैन्यास ग्रीक सैन्य अजूनही पौरसाच्या तळासमोरच आहे असे भासवणे.

(ब) प्रत्यक्ष लढाईत भारतीय सैन्य गुंतल्यावर नदी पार करून भारतीय सेनेस पिछाडीकडून घेरणे. या सेनेस सक्त ताकीद होती की जो पर्यंत पूर्ण भारतीय सेना युद्धात गुंतली जात नाही किंवा पळ काढून जात नाही तोवर नदी पार करायची नाही.

या सेनेत खालील पथके होती.

(अ) Krateros चे स्वतःचे अश्वदल. (संख्या समजत नाही)

(ब) म्यासेडोनिअयन phalanx तुकड्या. (संख्या समजत नाही)

(क) आंभी आणि इतर मांडलिक राजांचे भारतीय सैन्य. (संख्या समजत नाही)

२. दुसरा सैन्य विभागाचे नेतृत्व Meleager, Attalos, and Gorgias या ग्रीक अधिकाऱ्यांकडे होते. ही सेना अलक्षेन्द्राचा मुख्य तळ आणि तो जिथून नदी पार करणार होता यांच्या बरोबर मध्ये थांबणार होती. यांचे उद्दिष्ट नदी पार केलेल्या अलक्षेन्द्राची सेना आणि पौरसाची सेना एकमेकांना भिडली की लगेच नदी पार करून अलक्षेन्द्राच्या सैन्याची कुमक करणे आणि मुख्य लढाईत भाग घेणे हे होते.

या सेनेत काही अश्वदल आणि पायदळ होते. नक्की आकडे आणि पथके कळत नाहीत.

३. उरलेली सेना घेऊन अलक्षेन्द्र स्वतः वर उल्लेखित नदीच्या बेट असलेल्या जागी नदी पार करणार होता. या सेनेचे मुख्य उद्दिष्ट लढाई सुरु करून इतर सेनेच्या मदतीने भारतीय सेनेस परास्त करणे ही होते. या सेनेत companions हे अलक्षेन्द्राचे अंगरक्षक पथक, Hephaistion, Perdikkas, Demetrios, Kleitos, and Koinos यांच्या अधिपत्याखाली अव्वल दर्जाचे ग्रीक अश्वदल, hypaspists या अव्वल पायदळ phalanx तुकड्या, धनुर्धारी पदाती आणि Scythian धनुर्धारी अश्वदल होते.

ठरलेल्या रात्री सर्व ग्रीक सेनादले आपापल्या जागी जायला निघाली. खुद्द अलक्षेन्द्र त्याची वर उल्लेखित पथके घेऊन मुख्य तळापासून १७ मैल उत्तरेस नदी पार करायच्या जागी निघाला.

धाडस कारण्याल्याला नशीब सुद्धा साथ देते म्हणतात. अलक्षेन्द्राचे नशीब त्या रात्री त्याच्या बाजूने धावून आले. त्या रात्री प्रचंड वादळ आणि पाऊस सुरु झाला. त्या वादळ पावसाच्या कल्लोळात ग्रीक सैन्याच्या हालचालींचे आवाज झाकले गेले. नदी पार करण्याच्या ठरलेल्या जागी ग्रीक सेना नदी पार करू लागली. जोगळेकर म्हणतात त्याप्रमाणे नदी पार करताना त्यांनी होड्यांचा पूल बांधला असण्याची शक्यता फार कमी वाटते. तेवढा त्यांच्या कडे वेळच नव्हता. एका रात्रीत, पूल बांधणे, त्यावरून सेना पार करणे आणि तेही पौरसास न समजू देता, हे शक्य वाटत नाही. पण जर एका रात्रीच्या काही तासात ते होड्यांचा पूल बांधत असू शकत असतील तर ग्रीक अभियंत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. (गंमत म्हणून सांगण्यास हरकत नाही की १७६० साली भाऊसाहेब पेशव्याच्या मराठा फौजेस नदी पार करायला कैक महिने लागले होते. याचे कारण मराठ्यांना होड्या बांधून पूल बनवता येत नसे. पानिपतच्या पराजयाचे हे ही एक मुख्य कारण मानले जाते . मात्र इ. स. पूर्व ३५० वर्षांपूर्वी ग्रीक लोकांना होड्यांचा पूल बांधण्याची कला येत होती हे नोंद करण्यासारखे आहे! असो .)

रात्रीच्या काळोखात, प्रचंड वादळ पावसात ग्रीक सेनेनं नदी पार केली. यात त्यांची काही जीवित हानी नक्की झालीच असणार. काहीही असो, अलक्षेन्द्राच्या ग्रीक पथकांनी नदी पार केली. अलक्षेन्द्राची खात्री होती की आपल्या अव्वल अश्वदलाच्या आणि phalanx च्या मदतीने तो पौरसाच्या भारतीय सेनेचा धुवा उडवेल. किमान तसे नाही झाले तर बाकीची पथके नदी पार करेस्तोवर नदीच्या पूर्व किनाऱ्यावर एक भक्कम बचाव तळ ठोकून उभे राहील. लढाई आपल्या हातून जातेय असे दिसल्यावर दरायस प्रमाणे पौरस पण पळून जाईल अशीही त्याची अपेक्षा असावी.

त्याने ग्रीक सेना व्यूह खालील प्रमाणे रचला.

सर्वात पुढे Scythian धनुर्धारी अश्वदल. त्यामागे अव्वल दर्जाचे ग्रीक अश्वदल, त्यामागे hypaspists, त्यामागे phalanx पायदळ आणि या सर्व सैन्याच्या दोन्ही बगलांवर javelin फेकी पदाती आणि धनुर्धारी पदाती ठेवले. अशा व्यूहासह त्याने पौरसाच्या तळाच्या दिशेने दक्षिणेस कूच केले.

नकाशा : विकी



==============================================================

रणकंदन !!



ग्रीक सेनेने नदी पार केल्याची कुणकुण पौरसाच्या चौक्यांना लागताच त्यांनी तातडीने पौरसाकडे तसा निरोप धाडला. आता पौरसाचा गोंधळ उडाला. चौकीकडून आलेल्या संदेशावर विश्वास ठेवायचा तर आपल्या समोर नदीच्या पल्याड ग्रीक तळ ससैन्य जसाच्या तसा उभा. चौकीकडून आलेल्या संदेशावर विश्वास ठेऊन आपण आपली सेना पुढे नेली आणि आलेला संदेश हुलकावणी निघाली तर ग्रीक सेना आपल्या मागे मुख्य तळावरून नदी पार करून आपली पिछाडी गाठेल अशी त्याला भीती होती.

उलटपक्षी, चौकीकडून आलेली बातमी खरी असेल तर संपूर्ण शिस्तबद्ध ग्रीक सेनेशी मुकाबला करावा लागेल अशीही भीती. पौरसाने यावर एक उपाय शोधला. त्याने आपल्या मुलाला त्याचे १२० रथदळ आणि २००० भारतीय घोडदळ देऊन उत्तरेकडे नदी पार केलेल्या ग्रीक सेनेच्या मुकाबल्यासाठी पाठवले. या पौरसाच्या मुलाचे नाव मिळत नाही. इतकच काय तर या लढाईत पौरसाच्या एकही भारतीय अधिकाऱ्याचे नाव मला तरी मिळाले नाहीए. कोणास माहिती असेल तर सांगावी. ग्रीक सेना त्यांच्या पद्धतीप्रमाणे समांतर रेषेत उभी असेल अशी पौरसाच्या मुलाची अपेक्षा फोल ठरली. रात्रीच्या वादळ पावसाने आधीच चिखल झालेला होता. त्यात त्याचे रथ अडकून पडले. या अडकलेल्या रथांवरील असहाय भारतीय सैनिकांवर Scythian धनुर्धारी घोडदळाने बाणाचा वर्षाव केला. चिखलात अडकलेल्या भारतीय सैनिकांवर बाण मारताना त्यांना भलतीच क्रूर मजा आली असेल ! अलक्षेन्द्राच्या अंगरक्षक आणि इतर अव्वल घोडदळाने उरलेले भारतीय दुय्यम दर्जाचे भारतीय घोडदळ उधळून लावले. खुद्द पौरसाच्या मुलासह सुमारे ४०० रथदळाचे सैनिक या लढाईत मारले गेले. जे काही वाचले त्यांनी पौरसाच्या मुख्य तळावर येऊन अलक्षेन्द्राने नदी पार केल्याची , आणि त्याच्या मुलाच्या सहित रथदळाची कत्तल झाल्याची बातमी त्याला दिली. मुलाच्या मृत्यूचे दुःख विसरून पौरस युद्धास सज्ज झाला. त्याने ससैन्य मुख्य तळ सोडून अलक्षेन्द्राचा सामना करण्यासाठी कूच केले. मागे फक्त काही युद्ध हत्ती आणि थोडे पायदळ ठेवले. समोरील ग्रीक तळावरील ग्रीक सेनेने नदी पार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थोपवायची जबाबदारी या सेनेवर होती.

स्वतः पौरस एका युद्ध हत्तीवर बसून २०० युद्ध हत्ती, ३०० रथ , ३०००० पायदळ आणि धनुर्धारी पथक घेऊन एका मैदानावर येऊन ग्रीक सैन्याशी मुकाबला करण्यास सज्ज झाला. ग्रीक सैन्याच्या समोर त्याने आपले गजदल उभे केले. त्याच्या बगलांवर त्याने उरलेले रथदळ आणि अश्वदल उभे केले. गजदलाच्या लगेच मागे पायदळ होते. धनुर्धारी पथक बहुदा डाव्या बगलेवर असावे.

ग्रीक सैन्य आणि पौरसाचे सैन्य समोरा समोर आले. प्रथम ग्रीक Scythian धनुर्धारी अश्वदलाने पौरसाच्या डाव्या बगलेवर आणि मग मध्य भागातील गजदलावर बाणांचा वर्षाव केला. मारा आणि पळून जा या पद्धतीने त्यानी भारतीय सैन्यास बेजार केले. त्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय धनुर्धारी पदाती पुढे सरसावले. पण रणभुमीतील चिखलाने त्यांना त्यांचे धनुष्य चालवता येईनात. मागे सांगितल्या प्रमाणे भारतीय धनुष्य एक पुरुष भर उंचीचे असे आणि त्याचे एक टोक जमिनीत रोवून मग त्यावर तीर चढवून ते वापरावे लागे. चिखलाने ते शक्य होईना. त्यामुळे हे पथक ग्रीक धनुर्धारी अश्व पथकाच्या बाणांचे शिकार बनले. त्यांची ही दुर्दशा पाहून पौरसाच्या डाव्या बगलेवरील घोडदळ (२०००) पुढे सरसावले. त्यावर अलक्षेन्द्राने आपले अव्वल दर्जाचे घोदद्ल पाठवले आणि भारतीय घोडदळ उधळून लावले. आपली डावी बगल संकटात पडलेली पाहून पौरसाचे उजवीकडील बगलेवरील घोडदळ आणि रथदळ भारतीय सैन्याच्या मागच्या बाजूने वळून डाव्या बगलेवरील घोडदळाच्या मदतीस गेले. यामुळे भारतीय उजवी बगल रोमनांना हल्ल्यासाठी मोकळी मिळाली. कदाचित याच वेळी Meleager, Attalos, and Gorgias च्या नेतृत्वाखालील ग्रीक फौज नदी पार करून अलक्षेन्द्रास मिळाल्या असाव्या. आपले घोडदळ भारतीय युद्ध हत्तींपुढे शक्यतो येणार नाही अशी दक्षता अलक्षेन्द्राने घेतली. भारतीय उजवी बगल घोडदळाच्या बचावाशिवाय असलेली पाहून एक ग्रीक अश्वदल पौरसाच्या उजव्या बगलेकडून निघून, पौरसाच्या पिछाडीवरून डाव्या बगलेवर पोहोचले आहे तेथील भारतीय घोडदळ आणि रथदल यांच्या त्यांनी पुढून आणि मागून नाश केला.

मधल्या काळात ग्रीक पायदळphalanx तुकड्यावर भारतीय गजदल धावून गेले. या अवाढव्य उंचच उंच राक्षसी हात्तीना पाहून ग्रीक सेना थोडी धास्तावलीच होती. गजदलाच्या हल्ल्यापुढे ते कसे बसे टिकून राहिले. काही ठिकाणी ग्रीक रांग भेदली पण गेली. पण आपल्या शिस्तीच्या जोरावर परत रांग करून ते उभे ठाकले. त्यांनी हत्तींच्या सोंडा, डोळे आपल्या भाले आणि तलवारींनी भोसकल्या. त्यांच्या माहुतांना भाले बाण फेकून मारून टाकले. आंधळे झालेले, सोंडा कापले गेलेले माहूत रहित हत्ती मग उलटे फिरून भारतीय सेनेला तुडवत मागे पळू लागले.

Krateros च्या नेतृत्वाखाली एक भाग जो पौरसाच्या मुख्य तळाच्या समोर अलक्षेन्द्राच्या मुख्य तळावर होता तो याच संधीची वाट पाहत होता. संपूर्ण भारतीय सेना युद्धात गुंतलेली पाहून त्यांनी नदी पार केली आणि पौरसाने त्याना रोखण्यासाठी ठेवलेली सेना उधळून लावत भारतीय सेनेची पिछाडी गाठली. या सगळ्या गदारोळात भारतीय सेनेचा पळ सुरु झालेला होता. या पळणाऱ्या सेनेस Krateros च्या सेनेने कापून काढले.

आपण युद्ध गमावलेले आहे हे एव्हाना पौरसास समज होते. पण तरीही तो हत्तीवर बसून लढाई करत होता. समोर, मागे, डावीकडे आणि उजवीकडे सर्व बाजूनी भारतीय सेना वेढली गेली. पौरस स्वःत आपला जखमी खांदा घेऊन लढत होता. शेवटी अलक्षेन्द्राच्या सांगण्यावरून त्याने शस्त्र खाली ठेवले. त्याला कैद करून अलक्षेन्द्रापुढे आणण्यात आले. अलक्षेन्द्र त्याच्या पराक्रमाने, शौर्याने आणि धैर्यानं खूपच प्रभावित झाला. या पूर्वी त्याने दरायसला युद्ध भूमीतून पळ काढताना दोनदा पहिले होते. पण पौरसाची गोष्ट काही वेगळीच होती. अलक्षेन्द्राने त्याला "मी तुला कसं वागवू" असं विचारल्यावर त्याने"एका राजासारखे " असे उत्तर दिले. " हे पौरसा तू अजून काही माग" असे अलक्षेन्द्राने पुन्हा विचारले तेव्हा पौरस म्हणाला" मी जे मागितलंय त्यात सर्व काही आले आहे".



पुढे अलक्षेन्द्राने पौरसास एका राजाप्रमाणेच वागवले, पण एका मांडलिक राजासारखे. त्याचे राज्य त्यास परत दिले, पण ग्रीक साम्राज्याचे एक अंग म्हणून. पुढच्या भारतीय राजांविरोधातील मोहिमांत पौरसाचे सैन्य अलक्षेन्द्राच्या बाजूने लढले असणार यात शंका नाही.

या युद्धात झालेली हानी खालील प्रमाणे.

१. ग्रीक हानी -

अ. १००० पायदळ

ब. १००० अश्वदल

२. पौरसाची हानी

अ. २०००० पायदळ

ब. संपूर्ण रथदल

क. संपूर्ण अश्वदल

भारतीय अपयशाची कारणे :

१. जुनाट युद्ध पद्धतीवर भर

२. बाहेरच्या जगात काय चाललंय, इतर सेना काय काय नवीन लढाईची तंत्रे विकसित करतायत या कडे दुर्लक्ष्य.

३. कवायती आणि शिस्तबद्ध पायदळ तुकड्यांचा अभाव

४. धनुर्धारी घोडदलाचा अभाव

५. चिलखत न वापरणे.

६. अलक्षेन्द्राच्या सेनेकडे असणारी विविध लष्कराची अंगे(जसे अभियांत्रिकी पथक, हवामान वर्तवणारे लोक वगैरे) तशी भारतीय सैन्यात नसावीत.

७. राखीव सेनेचा अभाव.

८. गजदल आणि अश्वदल यांची अयोग्य हाताळणी.

९. लढाईची एक योजना फसली तर पर्यायी योजना नसणे.

तर या झेलम नदीकिनारी झालेल्या संग्रामाची कहाणी इथेच थांबवूयात. पुन्हा कधीतरी भेटूयात, अशाच एखाद्या भारतीय सेनानींच्या पराभवाच्या कहाणीच्या निमित्ताने !!


संदर्भ:
  1. भारतातील युद्ध शास्त्राची उपेक्षा -जोगळेकर
  2. चाणक्य मालिका
  3. You tube
  4. Images : Thanks WIKI 


कौस्तुभ पोंक्षे

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (कौस्तुभ पोंक्षे ©) कॉपीराईट आहे.

Comments